पावसाळ्यातील अविस्मरणीय सिंहगड प्रवास- Tejas Kakekar
गडावरील एक अविस्मरणीय प्रवास
आज तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक खास प्रसंग सांगणार आहे. तो पावसाळ्याचा दिवस होता. माझा मावस भाऊ गावीून पुण्यात परीक्षा द्यायला आला होता. तब्बल तीन-चार दिवस त्याच्या परीक्षा होत्या आणि त्यानंतर तो पुन्हा गावी जाणार होता. गावी जाण्याआधी त्याला सिंहगड फिरायची खूप इच्छा होती. मी एक महिना आधीच माझ्या मित्रांसोबत गड फिरून आलो असल्याने मला पुन्हा जाण्याची फारशी इच्छा नव्हती. पण त्याने आग्रह केल्याने, मी त्याला सिंहगड दाखवायचे ठरवले. आमच्यासोबत माझा लहान भाऊही होता.
मी याआधी उन्हाळ्यात दोन-तीन वेळा सिंहगडावर जाऊन आलो होतो. त्यामुळे मला गडाचा काहीसा अनुभव आणि रस्ता चांगला माहिती होता. रविवारी सकाळ उजाडली. आम्ही जवळपास सकाळी सहा वाजता घरातून निघालो. घरापासून कात्रजपर्यंत रिक्षाने गेलो आणि परतीचा प्रवास बसने करण्याचे ठरवले. मी कॉलेजला असल्याने माझ्याकडे आधीपासून कॉलेजचा बस पास होता. त्याचप्रमाणे त्या दोघांनीही आपापले बस पास काढले.
कात्रजपासून स्वारगेटपर्यंत बसने पोहोचलो आणि स्वारगेटहून सिंहगडाच्या बसमध्ये चढलो. बसमध्ये खूप गर्दी होती. कसेबसे धक्काबुक्की सहन करत, एकमेकांना आधार देत आम्ही सिंहगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. तिथे उतरल्यानंतर उत्साही शिवभक्त लगेच गड चढायला लागले. मात्र, आम्ही थोडावेळ थांबायचे ठरवले. सिंहगडाच्या प्रवेशद्वाराजवळ थोडा वेळ विसावलो. हात पसरून थंडगार वाऱ्याचा आनंद घेतला.
थोड्या वेळाने आम्ही “छत्रपती शिवाजी महाराज की जय!” अशा घोषणांनी गड चढायला सुरुवात केली. माझा मावस भाऊ खूप उत्साही होता. पावसामुळे गड हिरव्यागार पानांनी भरलेला होता. मी याआधी पाहिलेल्या गडापेक्षा तो जास्त सुंदर आणि ताजा वाटत होता. सुरुवातीला फोटो काढत आणि मस्ती करत आम्ही गड चढत होतो. आमचा आवाज इतर शिवभक्तांपर्यंत पोहोचत होता, आणि तेही आम्हाला प्रतिसाद देत होते.
गड चढताना जागोजागी पावसाचे छोटे झरे आणि ओहोळ दिसत होते. त्या पाण्याचा थंडावा अंगाला स्पर्श करत होता. वाटेत काही ठिकाणी किल्ल्याच्या भिंतींवर उमटलेल्या नक्षीकामाकडे लक्ष गेले. शिवकालीन इतिहासाचा तो साक्षीदार असलेल्या गडाच्या प्रत्येक भागाला स्पर्श करून आम्ही पुढे जात होतो.
गडाची सुंदरता अनुभवताना वेळ कसा गेला तेच कळले नाही. पाऊस झिमझिमत होता, थंड हवा अंगाला भिडत होती, आणि अंगावरची सगळी कपडे ओली झाली होती. आमच्याकडे रेनकोट नव्हते, तरीही आम्ही उत्साहाने गड फिरत होतो. एका क्षणी आम्ही गडमाथ्यावर पोहोचलो. सर्वप्रथम “नरवीर तानाजी मालुसरे” यांच्या पुतळ्याजवळ नतमस्तक झालो. थोडा नाश्ता करून आम्ही गड फिरायला सुरुवात केली.

गडाच्या विविध ठिकाणी आम्हाला इतिहासाच्या पाऊलखुणा दिसल्या. काही जुने बुरुज, काही पडझड झालेल्या इमारती, आणि एका ठिकाणी तर जुना तोफखाना पाहायला मिळाला. या सगळ्याने आम्ही त्या काळात जगत असल्यासारखे वाटले. सिंहगडाच्या माथ्यावरून दिसणारा पुण्याचा देखावा अप्रतिम होता. धुकं दऱ्यांतून वाहत होतं, आणि दूरवर पसरलेल्या हिरव्यागार पठारांनी मन प्रसन्न केलं.
संध्याकाळ होत आली होती. गड फिरून आम्ही पुन्हा “तानाजी मालुसरे” यांच्या पुतळ्याजवळ गेलो, नतमस्तक झालो आणि गड उतरायला सुरुवात केली. आम्ही खूप दमलो होतो, पण तरीही गड उतरायचा प्रवास पायीच करायचे ठरवले. सुमारे दीड-दोन तासात आम्ही गड उतरून पायथ्याशी पोहोचलो.
खाली आल्यावर जवळच्याच एका हॉटेलमध्ये नाश्ता केला. त्यावेळी गरम चहा आणि पोह्यांचा स्वाद खूपच दिलासा देणारा होता. बस पकडून आम्ही घरी पोहोचलो तेव्हा सगळी ऊर्जा संपलेली होती, पण मन मात्र समाधानाने भरलेले होते.
तो दिवस, ती सफर, आणि गडावरचा तो अनुभव आयुष्यभर स्मरणात राहील. सिंहगडावरचा तो दिवस एका जिवंत स्वप्नासारखा होता, जो आजही माझ्या मनात ताज्या आठवणींनी भरून राहिला आहे. 🚩
from gallery of Tejas kakekar

Post Comment